औरंगाबाद – शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे उद्या (20 जुलै) रोजी औरंगाबाद दौऱ्यावर असणार असून, गंगापूर येथे आयोजित कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. दरम्यान त्यांच्या याच दौऱ्याला आणि कार्यक्रमाला आता विरोध होताना पाहायला मिळत आहे. गंगापूर येथे उद्या होणाऱ्या संभाजीराव भिडे यांच्या कार्यक्रमाला परवनगी देऊ नयेत, अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायी आणि शहरवासियांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी गेल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यात देखील भिडे यांना असाच विरोध करण्यात आला होता.
संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाचे शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयामध्ये आयोजन करण्यात आले आहे. मात्र गंगापुर शहरात कार्यक्रम झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. देशाला व राष्ट्राला हानीकारक असणारे वक्तव्य करण्याची भिडेंची सवय आहे.
त्यामुळे शहारातील व तालुक्यातील शांतता बिघडवण्याचे काम होण्याची दाट शक्यता असल्याचा दावा करत या कार्यक्रमाला परवानगी न देण्याचे निवेदन डॉ.आंबेडकर प्रेमींकडून पोलिसांना देण्यात आले आहे. तसेच हा कार्यक्रम झाल्यास सभा आणि संबंधित कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.