मुंबई – गेल्या महिन्यातच लोकप्रिय मालिका “पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा प्रियकर विकी जैन सोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. अंकिता-विकी यांचा वविवाह मुंबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये अतिशय राजेशाही थाटात पार पडला होता.
या विवाह सोहळ्याला अनेक बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच अनेकांनी या नवविवाहित जोडप्याला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या. दरम्यान, लग्नानंतर अंकिताने पहिली मकर संक्रांत साजरी केली असून, या दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अंकिताने मकर संक्रांत साजरी करते वेळी खास काळी साडी आणि पांढऱ्याशुभ्र हलव्याचे विविध दागिने अंगावर परिधान केले होते. एरवी सोन्याच्या दागिन्यांच्या मोहात पडणाऱ्या महिलांना मकरसक्रांतीच्या सणासाठी हलव्याचेच दागिने हवे असतात. नवविवाहितेसाठी तर हल्ली हलव्याचे खास दागिने बनवून घेतले जातात.
अंकिताने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत नेटकऱ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिळ गूळ घ्या गोड गोड बोला! असे म्हणत तिळाचे लाडू देऊन मकर संक्रांत आपल्याकडे साजरी केली जाते.