नवी दिल्ली – भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सोमवारी पक्षाच्या व्हिडीओ व्हॅन्सचे अनावरण केले. त्या व्हॅन्स जनतेपर्यंत पोहचून पक्षाचा जाहीरनामा बनवण्यासाठी सूचना स्वीकारणार आहेत.
भाजपने व्हिडीओ व्हॅन्सचे नामकरण विकसित भारत-मोदी की गॅरंटी असे केले आहे. त्या व्हॅन्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहचवणार आहेत. त्याशिवाय, जनतेकडून आलेल्या सूचना स्वीकारणार आहेत.
त्या सूचनांचा समावेश भाजप आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात करणार आहे. तो जाहीरनामा म्हणजे भाजपचे संकल्पपत्र असेल. नड्डा यांनी जनतेपर्यंत व्हॅन्स पाठवण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून व्हॅन्स मार्गक्रमण करतील.
त्या माध्यमातून १५ मार्चपर्यंत १ कोटी सूचना गोळा करण्याचा संकल्प भाजपने केला आहे. लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा केंद्राची सत्ता काबीज करण्याचा निर्धार त्या पक्षाने केला आहे. त्यासाठी ३७० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.