गांधीनगर – गुजरातमधील गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपाने 44 पैकी 41 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. कॉंग्रेसच्या वाट्याला केवळ दोन जागा आल्या आणि आम आदमी पार्टीला केवळ एका जागेवरच विजय मिळवता आला आहे.
निवडणुकीत आम आदमी पार्टीने देखील उमेदवार उभे केल्याने, येथील लढत ही त्रिशंकू पाहायला मिळाली. आम आदमी पार्टीने 40 जागांवर उमेदवार उभा केले होते. तर, अन्य उमेदवारांमध्ये बसपाचे 14, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन, अन्य पक्षांचे सहा आणि अपक्ष 11 उमेदवारांचा समावेश होता.
भाजपाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी म्हटले की 44 पैकी 41 जागांवर भाजपाला जनतेने विजयी केले आहे. यावरून हे दिसून येते की लोकांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. तसेच, या निवडणुकीतून हे देखील स्पष्ट झाले की, गुजरातमध्ये तिसऱ्या पक्षासासाठी काही स्थान नाही.