पिंपरी – प्राधिकरणातील महावितरण कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे परिसरातील वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. वीज वापरापेक्षा वाढीव रकमेची बिले देण्याचे प्रकार सुरू आहेत. बिल दुरुस्तीसाठी ग्राहकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणच्या कारभाराबाबत ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्तहोत आहे. त्याच्या विरोधात बुधवारी भाजपकडून (दि. 21) प्राधिकरणाच्या महावितरण कार्यालयावर “जागा हो कुंभकर्णा’ आंदोलन करण्यात आले.
माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजा मोरे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. महावितरण कार्यालय प्रशासनाला कुंभकर्णाची प्रतिकात्मक प्रतिमा देऊन निषेध नोंदविण्यात आला. तसेच, निदर्शने करण्यात आली. तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
नगरसेविका शर्मिला बाबर, राज्य विद्युत वितरण समिती सदस्य समीर जावळकर, भाजपा प्राधिकरण-चिंचवड स्टेशन मंडल अध्यक्ष विजय शिनकर, प्राधिकरण-चिंचवड मंडल सरचिटणीस सचिन कुलकर्णी, भाजपा कार्यकर्ते सलीम शिकलगार, राधिक बोर्लीकर, मनोज देशमुख, आनंद देशमुख, सचिन बंदी, रमेश घाटे, केतन जाऊळकर, नरेंद्र येलकर, ग्राहक मंचाचे कार्यकर्ते देसाई, समीर जावळकर, प्रसेन अष्टेकर, नीलिमा कोल्हे आदी उपस्थित होते.
शैलजा मोरे म्हणाल्या, प्राधिकरणातील महावितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. परिसरात मनमानी पद्धतीने वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. नागरिकांच्या तक्रारीसाठी महावितरणचे अधिकारी गवारी यांच्याकडे पाठपुरावा करूनही प्रशासन ढिम्म आहे. ग्राहकांना भरमसाठ रकमेची वीज बिले पाठविली जात आहेत.
अधिकाऱ्यांना घरी जाणे मुश्किल केले जाईल- मोरे
अनुप मोरे म्हणाले, करोनामुळे आर्थिक मंदी, बेरोजगारीचे संकट उद्भवले आहे. प्राधिकरणातील महावितरणच्या विद्युत विभागाकडे नियोजनाचा अभाव आहे. नागरिकांना मोठ्या रकमेची बिले पाठविली जात आहेत. चुकीची अवास्तव बिले व वसुली यांनी जनतेला जेरीस आणले आहे.
महावितरणने ही लूटमार तातडीने थांबविली पाहिजे. आकुर्डी, प्राधिकरण, गंगानगर, पंचतारानगर परिसरात खंडित वीजपुरवठ्याची समस्या जाणवते आहे. विजेच्या उच्चदाबामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. या समस्यांचे निराकरण न केल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना घरी जाणे देखील मुश्किल केले जाईल.