मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी पुन्हा एकदा महाभूकंप झाला. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही फुट पडली आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसह एकूण 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व बेगडी असल्याचे म्हंटले आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना मिटकरी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व आणि दुसऱ्या पक्षाचे हिंदुत्व नाही का? मी आरएसएस आणि संघाचा टोकाचा विरोधक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील संघाच्या विरोधात होते. पण काँग्रेससोबत देखील त्यांची युती झाली नव्हती. शामाप्रसाद मुखर्जी होते त्यावेळी त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा होते. पण त्यांनी आरएसएसच्या विरोधातील आपलं युद्ध काही थांबवले नव्हते.”
पुढे ते म्हणाले, “आमच्या पक्षात इतर पक्षासारखी फुट पडलेली नाही. आमचा पक्ष फुटीर नाही. तर शरद पवार साहेबच आमचे आदर्श आहेत. अजित दादा आणि शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी पक्ष आहे. आम्ही फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार महाराष्ट्राला सांगणारे लोकं आहोत. आम्ही आमच्या तत्वाशी तडजोड करत नाही. त्यामुळे भाजप हिंदुत्व सांगत असेल तर भाजपचे हिंदुत्व बेगडी असल्याचं मी आजही सांगतो,” असे मिटकरी म्हणाले.