पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचाच आमदार होणार असल्याचा विश्वास शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी विश्वास व्यक्त केला. हा विजय लाखाच्या फरकाने करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच चिंचवड विधानसभेच्या 13 प्रभागात आजपासूनच मैदानावर उतरून काम करण्याचे आदेश सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी दिले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीला दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आणि चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, आमदार जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, सरचिटणीस राजू दुर्गे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, चंद्रकांत नखाते, अनुप मोरे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, महिला आघाडी शहराध्यक्षा उज्वला गावडे यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, शक्तीकेंद्र प्रमुख, पेजप्रमुख, बुथ केंद्रप्रमुख, सर्व आघाड्यांचे अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी महेश लांडगे म्हणाले, पिंपरी-चिंचवडच्या गाव ते शहर या प्रवासात आमदार लक्ष्मण जगताप यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांनी राजकारण आणि समाजकारण करताना सर्व घटकांना सोबत घेऊन काम केले. केवळ शहराचा विकास न करता त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही बळ दिले. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना सुद्धा ते आदर्शवादी होते.
आमदार लक्ष्मण जगताप यांची पक्षनिष्ठा कधीच विसरता न येणारी आहे. त्यांच्या जाण्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला दुःख बाजूला ठेवून या पोटनिवडणुकीत न भूतो न भविष्यती विजय मिळवण्यासाठी काम करावे लागणार आहे. भाजपचा प्रत्येकजण आपल्या लक्ष्मण जगताप यांचा विकासाचा वारसा जपण्यासाठी ही पोटनिवडणूक ताकदीने लढवणार आहे. पोटनिवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे. सर्वांनी मिळून एकदिलाने ही पोटनिवडणूक लढवूया. पोटनिवडणुकीतील विजय हा राज्यातील सर्वात मोठा विजय ठरावा यासाठी आपण सर्वांनी काम करायचे आहे. एक लाखांपेक्षा अधिक फरकाने चिंचवडची पोटनिवडणूक जिंकण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.