पुण्यातील संघाच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांची खलबते
पुणे – बारामती विधासनसभेकरीता इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्यानंतर येथे कमळ फुलविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घेण्यात येणार आहे. याकरीता संघानेही तयारी दर्शविली असून या पार्श्वभूमीवर पुण्यातील संघाच्या मोतीबाग येथील कार्यालयात भाजपची महत्त्वाची बैठक आज घेण्यात आली. यानुसार बारामती आणि इंदापूर येथे तगडे उमेदवार देण्याबरोबरच ताकद कशी लावता येईल, याविषयी चर्चा करण्यात आली. यामुळे बारामतीत अजित पवार यांच्या विरोधातील तसेच इंदापुरात भाजपचा उमेदवार कोण, याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
बारामती विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सासवड (ता. पुरंदर) येथे घेण्यात आल्या. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पुरंदर, बारामती, भोर-वेल्ह-मुळशी, इंदापूर, दौंड या मतदारसंघांसाठी मुलाखती घेतल्या. त्यामध्ये बारामती मदारसंघातून उमेदवार कोण, याबाबत खल चालला आहे. कारण, बारामतीतून रंजन तावरे, कुलभूषण कोकरे, गोविंद देवकाते, अभिजित देवकाते, सुरेंद्र जेवरे, राहुल तावरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अजित पवार यांच्या विरोधात लढण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु, बारामतीत गेल्या 25 ते 30 वर्षात पवार कुटुंबीयातील उमेदवारास कोणत्याही पक्षाला पराभूत करता आलेले नाही. बारामतीच्या विकासाची पायाभरणी याच कुटुंबाने केल्याने या मतदारसंघावर त्यांचीच पकड कायम आहे. ही बाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मान्य केली आहे. यामुळे बारामतीत पवार यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा असेल तर तो तेवढ्याच ताकदीचा द्यावा लागणार आहे. तसेच, भाजपला बारामतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही मदत घ्यावी लागणार आहे. पुण्यातील संघाच्या कार्यालयात याच पार्श्वभूमीवर आज महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस संघाचे महत्त्वाचे पदाधिकारी तसेच भाजपचे नेते
उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीनंतर बारामती विधानसभेकरीता पुन्हा एकदा भाजपकडून पवार यांच्या विरोधात मोट बांधली जात आहे. याच दरम्यान इंदापुर विधानसभेकरीताही भाजपने तयारी केली असून याचा आढावाही पुण्यातील बैठकीत घेण्यात आला. इंदापुरातून मातब्बर नेत्यांची नावे पुढे येत नसली तरी इंदापुरात भाजप मोठी ताकद लावणार आहे, यासाठी जो कोणी उमदेवार असेल त्याला मोठी रसद राष्ट्रीय स्वयं संघाकडूनही पुरविण्यात येणार असल्याने इंदापुरातील भाजपचा उमेदवार कोण असेल यावरही चर्चा करण्यात येत असून यादृष्टीने संघाच्या कार्यालयात मोजक्या पदाधिकाऱ्यांसह आज झालेल्या बैठकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
बारामती, इंदापूरसाठी चाचपणी…
बारामतीचे आमदार अजित पवार यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागलेला असताना या विधानसभा मतदार संघासाठी भाजपकडून जय्यत तयारी केली जात आहे. तर, इंदापुरातही भाजपकडून चाचपणी सुरू असल्याने मोठ्या पक्षाचा नेता पक्षात आणण्याकरीताही येथे प्रयत्न होऊ शकतील, याच करणातून बारामती आणि इंदापुरकरीता भाजप कोणती खेळी करणार, यावर आगामी काळातील राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.