नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाचे खासदार धीरज प्रसाद साहु यांच्या कुटुंबाची मालकी असलेल्या कंपनीच्या संदर्भात आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत ३५१ कोटी रूपये जप्त करण्यात आल्याचे पाश्र्वभूमीवर बोलताना भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे.
गळ्यापर्यंत भ्रष्टाचारात बुडालेल्या कॉंग्रेस पक्षाचा हा केवळ एक नमुना आहे. हा पैसा कोणाचा आहे आणि तो कसा लुटण्यात आला याचे उत्तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
संसद भवन परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आज नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या खासदारांनी निदर्शने केली. यावेळी साहु यांच्या अटकेचीही मागणी करण्यात आली. साहु यांच्याकडे जी रक्कम आढळली आहे ती देशातील कोणत्याही तपास संस्थेत एकाच ठिकाणी केलेल्या कारवाईत आढळून आलेली ही आतापर्यंतची विक्रमी रक्कम असल्याचे सूत्रांनी माध्यमांना सांगितले. भ्रष्टाचार आणि कॉंग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भ्रष्टाचार, लाचखोरी आणि गुन्हेगारीकरण यासाठीच हा पक्ष ओळखला जातो. हीच त्यांनी रीत आणि नीती असल्याची बोचरी टीका नड्डांनी केली.
सोनिया गांधी, राहुल गांधी वारंवार तपास संस्थांवर टीका करतात. त्यांच्यावर आरोप करतात. आता त्यांनी ही सापडलेली रक्कम कुठून आली याचेही उत्तर द्यावे. चुकीचे काम करणाऱ्यांचे पितळ आम्ही उघडे पाडू आणि त्यांना तुरूंगात टाकू. तोपर्यंत नरेंद्र मोदी सरकार स्वस्थ बसणार नाही असेही त्यांनी सांगितले.