ते अविव, (इस्रायल) – इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी हमासच्या दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले आहे. हमास आणि इस्रायलदरम्यानचे युद्ध सुरू होऊन ६६ दिवस झाले आहेत. गाझाच्या अंतर्गत प्रदेशात इस्रायलच्या फौजा घुसल्या आहेत आणि एकापाठोपाठ एक हमासशी संबंधित ठिकाणे उद्ध्वस्त केली जात आहेत. याच दरम्यान नेतान्याहू यांनी हमासच्या दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही आठवड्यात हमासच्या डझनभर दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यांनी शस्त्रे खाली ठेवली असून ते आता इस्रायलचे सैनिक बनले आहेत. युद्ध अजून संपलेले नाही. मात्र हमासचा शेवट व्हायची वेळ आली आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी सिनवारसाठी मरू नये.
आताच आत्मसमर्पण करावे, असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. इस्रायली फौजांनी हमासच्या शेजिया बटालियनचा कमांडर विसाम फरहाद याचा खात्मा केला असून त्याच्या जागेवर इमाद कारिका हा कमांडर झाल्याचाही दावा केला आहे.
बोगद्यांचे मोठे नेटवर्क सापडले…
दरम्यान इस्रायली फौजांनी गाझा सिटीतील पॅलेस्टाइन चौकाखाली बोगद्यांचे मोठे नेटवर्क शोधून काढल्याचा दावा इस्रायलच्या सैन्याच्या प्रवक्त्यांनी केला आहे. इस्रायलच्या सैन्याने पॅलेस्टाइन चौक ताब्यात घेतला आहे.
येथील बोगद्यांचे नेटवर्क थेट शिफा रुग्णावलयाला जोडणारे आहे आणि याच भागात हमासचे मुख्य कमांड सेंटर आहे. युद्धाला सुरुवात झाल्यानंतर येथील दहशतवादी अन्यत्र गेले असल्याचेही या प्रवक्त्याने सांगितले. हमासविरुद्धच्या कारवाईमध्ये इस्रायलचे ९८ सैनिक मारले गेले आहेत आणि अन्य ५ सैनिक गंभीर जखमी झाल्याचेही प्रवक्त्याने म्हटले आहे.