मुंबई – पुण्यात झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गृहमंत्री पदाबाबत मिश्किल टिपण्णी केली. अजित पवार यांनी यावेळी महाविकास आघाडीचे सरकार असताना आपण गृहमंत्रीपद मागितले होते याबाबत विनोदी शैलीत भाष्य केले. मात्र यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. भाजप नेत्याने अजित दादांच्या विधानाचा समाचार घेत टोलेबाजी केली आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत दादांना ट्विटद्वारे टोला लगावला आहे. अतुल भातखळकर सोशल मीडियावरून अनेकदा विरोधकांचा जोरदार समाचार घेत असतात. भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,दादा…तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. पण ते म्हणजे मढ्या मागून रड असा प्रकार झाला”.
काय म्हणाले होते अजित पवार नेमकं
कार्यकारिणीच्या बैठकीत अजित दादा म्हणाले होते,राज्यात सरकार आल्यानंतर मला उपमुख्यमंत्री केलं. मी वरिष्ठांना म्हटलं की मला गृहखातं द्या. पण तेव्हा ते अनिल देशमुखांना दिलं गेलं. नंतर पुन्हा मी गृहखातं मागितलं. तर तेव्हा ते दिलीप वळसे पाटलांना दिलं. कदाचित वरिष्ठांनाही वाटलं असेल की याला गृहमंत्री केलं तर हा आपलंही ऐकणार नाही”. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये तुफान हशा पिकला होता.