मुंबई – ओबीसी आरक्षणाला न्यायालयात फटका बसल्यानंतर या विषयावर चर्चा करण्यासाठी उद्या म्हणजे शनिवारी भाजपाच्या ओबीसी मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाबाबत पुढील रणनिती ठरवण्यासाठी भाजपाच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या दादर येथील मुंबई कार्यालयात ही बैठक होणार आहे. भाजपा नेते संजय कुटे आणि योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे. ज्या प्रभागांमध्ये ओबीसीचे आरक्षण रद्द झाले आहे त्या ठिकाणी ओबीसी उमेदवारच देणार असल्याची भूमिका चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे. याबाबत या बैठकीत काय निर्णय घेतला जातो यावर पुढील बाबी अवलंबून असणार आहेत.
दरम्यान, या विषयावर नुकतीच महाविकास आघाडीची बैठक पार पडली. त्याबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेणार नाही. सगळ्याच पक्षांनी सहकार्य केले आहे व ते पुढेही करावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली.
ओबीसी आरक्षणाचा हा विषय आता फक्त राज्याचा विषय राहिला नसून तो देशाचा प्रश्न झाला आहे. त्यामुळे या विषयात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावे अशी विनंती छगन भुजबळ यांनी केली आहे.