नगर – नगर शहरात शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचाराबाबत येत्या तीन दिवसात निर्णय जाहीर करू असे माजी खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगूनही अद्याप कोणतीच भूमिका घेतलेली नाही.
गांधी यांचे समर्थक सेनेचे उमेदवार अनिल राठोडांच्या प्रचारात कुठेच दिसत नाहीत. तर दुसरीकडे भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे हेही राठोड यांच्या प्रचारापासून चार हात दूरच आहेत.गांधी व वाकळे दोन्हीही जिल्ह्यातील भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत.मात्र मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या त्यांच्याच शहरातील उमेदवाराच्या प्रचारात दिसत नाहीत.
गांधी व राठोड यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. गांधी यांनी राठोड यांच्या उमेदवारीस उघड विरोध केला होता. राठोड यांनीही आले तर सोबत अन्यथा त्यांच्याशिवाय अशी भूमिका घेतली होती.पण उमेदवारीनंतर चित्र बदलले.राठोड यांचे समर्थक चार वेळा गांधींच्या बंगल्यावर जावून आले पण त्यांना अजून यश आलेले नाही.
दुसरीकडे महापौर वाकळे यांना मनपात सेनेच्या नगरसेवकांचे सहकार्य मिळत नसल्याने तेही राठोड यांच्या प्रचारापासून अलिप्तच आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा वगळता वाकळे परत सेनेच्या प्रचारात दिसलेले नाही. गांधी व वाकळे जर राठोड यांच्या प्रचारापासून शेवटपर्यंत दूर राहिले तर राठोंडाची डोकेदुखी वाढू शकते.