पुणे – भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पुणे दौऱ्यात शिवसेना कार्यकर्ते आणि सोमय्या यांच्यात झटापाट झाली. या झटापटीत किरीट सोमय्या जखमी झाले असून एक्सरे काढण्यासाठी आणि इतर तपासण्या करण्यासाठी त्यांना पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोरोना काळात पुण्यात उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी ते आज पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर पुणे महानगरपालिकेत आयुक्तांनाही सोमय्या तक्रार देणार होते. परंतु, यावेळी सोमय्या पुणे महापालिकेच्या इमारतीत प्रवेश करताना इमारतीत आधीपासूनच उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि झटापट झाली. त्यानंतर सोमय्या यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवर पडले. त्यामध्ये ते जखमी झाले.
किरीट सोमय्या यांच्या विरोधात पुण्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी सोमय्या यांची गाडी अडवून गाडीवर हाताने ठोसे मारले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पुणे महानगर पालिकेच्या इमारतीसमोर एकच गोंधळ उडाला.