इंदापूर (नीलकंठ मोहिते) : राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshawardhan Patil) गेल्या दहा वर्षापासून कोणत्याही सत्तास्थानी नाहीत.तरी देखील राज्याच्या राजकारणात चर्चेत असतात. अशी चर्चा रविवारी पार पडलेल्या पवार कुटुंबीयांच्या विद्या प्रतिष्ठानच्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल चिंचोली उद्घाटन समारंभात हर्षवर्धन पाटलांनी एन्ट्री करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेत राजकीय चर्चेला उधाण आणले.
तसे पाहिले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील दहा वर्षापासून विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांना ताकद देऊन,इंदापूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसनमय केली. व राज्यभर दरारा असलेल्या हर्षवर्धन पाटलांना सत्तेपासून दूर थांबावे लागले. गेल्या दहा वर्षापासून आमदार दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील विकासासाठी कोट्यावधी रकमेचा निधी आणून, तालुक्याचा विकासात्मक कायापालट करीत आहेत.त्यामुळे ते शरद पवार अजित पवार यांचे गळ्यातील ताईतच बनले होते परंतु राज्याच्या राजकारणाची समीकरणे मागील काही महिन्यापासून बदलल्यामुळे,राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच दोन गट निर्माण झाले.
जे – जे आमदार अजित पवार गटामध्ये गेले आहेत.त्यांच्या मतदारसंघात खुद्द शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी अधिकची ताकद लावून ते मतदार संघ आपल्या विचाराचे पुढील कालावधीत कसे राहतील यासाठी नवे राजकीय समीकरणे आखण्याचे काम रीतसर पणे चालू ठेवले आहे यामध्ये इंदापूर तालुका देखील,शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या टार्गेटवर आहे.थेट भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना कार्यक्रम पत्रिकेत नाव नसताना देखील कार्यक्रमाला बोलवून पवारांनी अनोखा इशाराच दिलेला दिसतो.
जर आगामी काळात अजित पवार गट वेगळाच विधानसभेला लढला तर शरद पवार गटातून कोण उमेदवार म्हणून उभे असणार याची एक झलक आल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात रंगली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला निश्चित. तसेच भाजप नेते हर्षवर्धन पाटील पवारांच्या कार्यक्रमाला गेले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्हीही गट बुचकाळात पडले आहेत.