बेंगळुरू – लोकसभा निवडणुकीसाठी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जेडी(एस) सोबत भारतीय जनता पक्षाचा निवडणूक समझोता झाला आहे. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी ही घोषणा केली आहे. आज झालेल्या समझोत्यानुसार जेडीएस कर्नाटकात भाजपबरोबर युती करून चार जागा लढवणार आहे.
कर्नाटकात लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत. भाजप आणि जेडीएस यांच्यात झालेल्या समझोत्यानुसार जेडीएस पक्षाला चार जागा देण्यास भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मान्यता दिली आहे असे येडियुरप्पा यांनी सांगितले.
येथे पत्रकारांशी बोलताना येडियुरप्पा म्हणाले की यामुळे आम्हाला मोठे बळ मिळाले आहे आणि आम्हाला लोकसभेच्या 25 किंवा 26 जागा एकत्रितपणे जिंकण्यास मदत होईल. जेडीएस पक्षाचे प्रमुख देवेगौडा यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर लगेचच हा युतीचा निर्णय झाला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला कर्नाटकात 25 जागा मिळाल्या होत्या, तर कॉंग्रेस व जेडीएस यांना प्रत्येकी एक जागा मिळाली होती. पण अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने भाजप व जेडीएस या दोन्ही पक्षांचा दारूण पराभव करून घवघवीत यश मिळवल्याने राज्यातील राजकीय समिकरण बदलेले आहे. त्यामुळे भाजप आणि जेडीएस या दोन्ही पक्षांना एकत्र येणे भाग पडले आहे.