शेवगाव,(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील एकूण ३६५ मतदान केंद्रासाठी तसेच राखीव असे एकूण ४३८ मतदान यंत्रे सीलबंद करण्याचे कामकाज आज सोमवारी सुरू करण्यात आले आहे. मतदानासंदर्भातील सर्व कामे वेळीच पूर्ण करून हातावेगळी करण्याचे कार्य येथील निवडणूक यंत्रणा रात्रंदिवस तहसील कार्यालयात थांबून करत आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार प्रशांत सांगडे सध्या येथेच तळ ठोकून आहेत.
शेवगाव मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या तीन लाख ६१ हजार १९४ असून त्यात एक लाख ८९ हजार ४१० पुरुष व एक लाख ७१ हजार ७७९ महिला व इतर ५ मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी ३१ झोन पाडण्यात आले असून, त्यात शेवगाव तालुक्यातील १८ तर पाथर्डीतील १३ झोनचा समावेश असून ३१ झोनल ऑफिसर नियुक्त करण्यात आले आहे.
मतदान व्यवस्थेसाठी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचारी, शिपाई अशा एकूण दोन हजार ४५ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्या करण्यात आल्या. त्यासाठी नगर, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, पारनेर, राहुरी तालुक्यातून कर्मचाऱ्यांची पथके दाखल झाली असून त्यांच्यासाठी येथील त्रिमूर्ती विद्यालयात जिल्हाधिकारी शालीमठ यांच्या उपस्थितीत मतदान प्रशिक्षण नुकतेच पार पडले. मतदान कर्मचारी, मतदान यंत्र व इतर आवश्यक साहित्य वाहून नेण्या आणण्यासाठी ३६ एसटी बसेस व १०५ वाहने तैनात करण्यात आली आहे.
मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ज्या गावातून ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदानाची नोंद झाली आहे, अशा मतदारसंघातील दहा मतदान केंद्राच्या परिसरात विशेष पथके नियुक्त करण्यात आली. या पथकातील अधिकारी, कर्मचारी केंद्राच्या परिसरात घरोघरी संपर्क करून मतदान जागृती करीत आहे.
त्यात पाथर्डी (बुथ क्रमांक २३६ ), शेवगाव (बुथ क्रमांक ७२), नागलवाडी, लमानतांडा, लखमापुरी , टाकळीमानूर, आल्हनवाडी, गोळेगाव , भातकुडगाव व रूपरवाडी येथील मतदान केंद्राचा समावेश आहे. याशिवाय मतदारसंघातील वयोवृद्ध दिव्यांग व गंभीर आजारी अशा ८५ मतदारांचे सिलबंद मतदान घरी घेण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी मते, तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली . याकामी निवडणूक नायब तहसीलदार राजेंद्र बकरे , सुरेश बर्डे , श्रीकांत गोरे विशेष योगदान देत आहेत.