नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या लिटमस टेस्टमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत इंडिया आघाडीला जबरदस्त झटका दिला आहे. 56 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 30 जागा जिंकल्या आहेत. भाजपचे संख्याबळ 97 तर रालोआ 117 वर पोहचली आहे. यानंतर भाजप राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष झाला आहे.
निवडणूक आयोगाने 15 राज्यांतील 56 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. यात सर्वाधिक उत्तरप्रदेशातील 10 जागांचा समावेश होता. या पाठोपाठ महाराष्ट्र आणि बिहारमध्ये प्रत्येकी सहा, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी पाच, कर्नाटक आणि गुजरातमध्ये प्रत्येकी चार, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी तीन आणि उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक झाली.
राज्यसभेच्या 56 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 30 जागा जिंकल्या आहेत. यातील 20 खासदार बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय, उत्तरप्रदेश आणि हिमाचल प्रदेशात एक—एक खासदार अतिरिक्त निवडून आल्यामुळे भाजपचे 10 खासदार निवडून आले.
हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांत क्रॉस व्होटिंग झाले. यामुळे या दोन्ही राज्यांत भाजपला प्रत्येकी एक जागा अतिरिक्त मिळाली आहे. यूपी आणि हिमाचलमधील काँग्रेस आणि सपाच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग केले. याचा फायदा भाजपला झाला. महत्वाचा मुद्या म्हणजे, कॉग्रेस आणि सपाच्या आमदारांनी क्रॉस व्होटींग लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी केली आहे. यामुळे लोकसभेच्या निवडणुकीचे चित्र नेमके कसे असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर भाजप आणि भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ज्येष्ठ सभागृहातील संख्या बहुमताजवळ पोहचली आहे. भाजपची सदस्यसंख्या 97 झाली आहे. तर, राज्यसभेतील रालोआ खासदारांची संख्या 117 वर पोहचली आहे. सध्या राज्यसभेची सदस्यसंख्या 240 आहे. अशात 121 हा बहुमताचा आकडा राहणार आहे.
नवनियुक्त खासदारांचा शपथविधी झाल्यानंतर रालोआची सदस्यसंख्या 117 वर पोहचणार आहे. अर्थात बहुमताच्या आकड्यापासून रालोआ आता फक्त चारने मागे आहे. एकट्या भाजपची संख्या 97 एवढी होणार आहे. यात पाच नामनिर्देशित सदस्यांचा समावेश आहे. तर काँग्रेस 29 खासदारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
56 जागांच्या निवडणुकीचा निकाल
या निवडणुकीत भाजपने 30, कॉग्रेस 9, तृणमूल कॉग्रेस 4, वायएसआर कॉग्रेस 3, राजद 2, बीजेडी 2, सपा 2, राष्ट्रवादी कॉग्रेस 1, शिवसेना 1, भारत राष्ट्र समिती 1 आणि जेडीयू 1 जागा जिंकली आहे. यातील 41 खासदार निर्विरोध निवडून आले होते. मंगळवारच्या मतदानानंतर भाजप 97 सदस्यांसह राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष झाला आहे. यानंतर राज्यसभेत काँग्रेसचे २९, तृणमूल काँग्रेसचे १३, डीएमके आणि आपचे प्रत्येकी १०, बीजेडी आणि वायएसआरसीपीचे प्रत्येकी नऊ, बीआरएसचे सात, आरजेडीचे सहा, सीपीएमचे पाच आणि एआयएडीएमके आणि जेडीयूचे प्रत्येकी चार सदस्य होतील.