आगरतळा – हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे, त्यामुळे या विषयावर भाष्य करणे आपल्यासाठी योग्य होणार नाही. पण या प्रकरणात भाजपकडे लपवण्यासारखे किंवा घाबरण्यासारखे काहीही नाही असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.
ते म्हणाले की आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. एक मंत्री या नात्याने या विषयावर मी भाष्य करणे योग्य होणार नाही असे नमूद करीत त्यांनी या विषयावर भाष्य करणे टाळले. अदानी प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर अनेक प्रकारचे आरोप करून त्यांना घेरले आहे.
या विषयाची संयुक्त संसदीय चौकशी समिती मार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी लाऊन धरली आहे. त्यांनी अदानी समूहातील एलआयसी आणि काही सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या गुंतवणुकीबाबत प्रश्न विचारले आहेत. पण त्यावर सरकारकडून कोणतेही भाष्य आजपर्यंत आलेले नाही.
राहुल गांधींच्या लोकसभेतील नुकत्याच झालेल्या भाषणाबद्दल विचारले असता, अमित शहा म्हणाले की, त्यांचे लोकसभेतील भाषण संपूर्णपणे अदानी समूहाशी संबंधित होते, त्यांनी कोणते भाषण द्यायचे आहे हे कॉंग्रेस नेते किंवा त्यांच्या पटकथा लेखकांनी ठरवायचे आहे.