अमरोहा (उत्तर प्रदेश) – बनावट नोटा छापण्यात गुंतलेल्या आरोपीची उत्तरप्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील मालमत्ता राज्य सरकारने जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 94 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
जप्त केलेल्या मालमत्तेची मालक, साझिया उर्फ संजू हिच्यावर बनावट नोटा छापल्याचा तसेच तस्करी आणि बनावट चेक जारी करून पैशांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हीं मालमत्ता आता जप्त करून सील करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, कोणीही ही मालमत्ता खरेदी करू नये म्हणून पोलिसांकडून लाऊडस्पीकरद्वारे आणि ढोल वाजवून आसपासच्या लोकांना माहिती देण्यात आली आहे. उत्तरप्रदेशात बनावट नोटा छापून त्याचे वितरण करणाऱ्या टोळीत या आरोपीचा सहभाग होता हे तपासाअंती स्पष्ट झाल्यानंतर संबंधीत आरोपीच्या विरोधात हीं कारवाई करण्यात आली आहे.