मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले गेले असून भाजपसह विविध पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. विधान परिषदेच्या निवडणुका चांगल्याच रंगतदार होणार असे दिसते आहे. मोठ्या नाट्यमय घडामोडी राजकीय क्षेत्रात घडत आहेत. माजी आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. मात्र त्याला भाजपचे समर्थन असणार आहे. आज सकाळी सदाभाऊंनी आपला भाजप समर्थित अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. आता विधपरिषद निवडणुकीसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली असून विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत.
पक्ष आणि उमेदवार
दरम्यान काल भाजपकडून प्रवीण दरेकर, उमा खापरे ,श्रीकांत भारतीय, राम शिंदे, प्रसाद लाड (५) आणि सदाभाऊ खोत अपक्ष (१) हे रिंगणात असतील तर शिवसेनेकडून सचिन आहीर आमश्या पाडवी हे (२) उमेदवार , राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे ,रामराजे नाईक निंबाळकर हे २ उमेदवार ,काँग्रेसकडून भाई जगताप , चंद्रकांत हंडोरे हे (२) उमेदवार असे एकूण १२ उमेदवार रिंगणात असतील.
विधानपरिषद निवडणुक चुरशीची होणार
दरम्यान भाजपकडून विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत या दोघांच्या नावांची मोठी चर्चा होती. मात्र भाजपकडून बुधवारी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेल्या यादीतून या दोघांचीही नावे वगळण्यात आली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा मोठा विषय ठरला होता. तर आज सदाभाऊ खोत स्वत: विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे २०२२ ची ही विधानपरिषद लढत चुरशीची होणार यात शंका नाही.