कोपरगाव -कोपरगाव शहरात उभारण्यात आलेल्या कमानीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी रात्री कमालीचा राडा झाला. दोन्ही गटात वाढत चाललेली धुसफुस पाहता अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून वादग्रस्त कमान नगरपालिका व पोलिसांनी काढून टाकल्याने या वादावर पडदा पडला. या राड्यात पोलीस निरीक्षक जखमी झाले असून मुख्याधिकाऱ्यांचा रक्तदाब वाढला होता.
या घटनेची पोलिसांकडुन मिळालेली माहीती अशी की, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील मुख्य रस्त्यावर काळे व कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी सुरु केली. दहीहंडी उत्सवाच्या पुर्व तयारीसाठी काळे गटाचे कार्यकर्ते विविध ठिकाणी फलक व कमान उभाण्यास सुरुवात केली. कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील काळे गटाने उभारलेली कमान आमच्या दहीहंडी उत्सवाला अडथळा निर्माण करणारी आहे, असे म्हणत त्या कमानीवर आक्षेप घेतला. व ही कमान काढण्याची तक्रार पालिका व पोलीस प्रशासनाकडे केली.
प्रशासनाने दोन्ही गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना मंगळवारी दिवसभर समजावू सांगण्याचा प्रयत्न केला होते. उभारलेली कमान कोल्हे गटाच्या सांगण्यावरुन काढावी लागते असा समज करुन ती कमान फक्त प्रशासनाच्या सांगण्यावरुन उद्या काढु पण कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले व इतर पदाधिकाऱ्यांनी घेतला तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाणुनबुजून विनापरवाना कमान उभी करुन आम्हाला अडथळा निर्माण केला आहे. ती आत्ताच्या आत्ता काढण्याचा हट्ट भाजपचे दत्ता काले, पराग संधान यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने कमानीचा वाद कमालीचा चिघळला.
मंगळवारी सकाळी अकरा वाजता सुरु झालेला हा वाद दिवसभर सुरु होता. अनेक चर्चा झाल्या पण कोणीच मागे हटेना. घोषणाबाजी, ढकला ढकली, आरोप प्रत्यारोपाने संपूर्ण दिवस तणावात गेला. अखेर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सायंकाळी पाच वाजता शिघृकृती दलाची पोलीस तुकडी मागवली. पोलिसांचे वाढते संख्याबळ आणि होणारा वादविवाद पाहुन नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मुख्याधिकारी बाहेरगावी असल्याने वाद मिटत नव्हता.
अखेर मुख्याधिकाऱ्यांनी नाशिक येथुन तातडीने कोपरगाव गाठले. मुख्याधिकाऱ्यांची अगोदरच प्रकृती खराब असल्याने ते नरमगरम होते. अशातच दोन्ही गटातील कार्यकर्ते मुख्याधिकाऱ्यांसमोर आक्रमक होत वादविवाद सुरु असल्याचे पाहुन मुख्याधिकाऱ्यांनी समजावून सांगुनही कोणीही न ऐकल्याने मुख्याधिकाऱ्यांचा रक्तदाब वाढला.
मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी रात्री अकरा वाजता दोन्ही गटाची समजुत काढून वादावर पडदा टाकला. काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी एकमेकांसमोर जोरजोरात घोषणाबाजी सुरु करीत आमनेसामने आले. रात्री अकरा वाजता पुन्हा दोन्ही गट एकमेकांसमोर भिडल्याचे समजताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दोन्ही गटाच्या दिशेने पोलिसांची तुकडी घेवुन धावले. दिसेल त्याला लाठीचा प्रसाद देण्यास सुरु केला. पोलिसांना पहाताच उपस्थित चौकातील सर्वांची एकच पळापळ सुरु झाली. पोलिसांनी हिसका दाखवताच दोन्ही गटाचे कार्यकर्ते गल्ली बोळात पळ काढून गायब झाले. आक्रमक कार्यकर्त्यांना पकडण्याच्या प्रयत्नात पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचा पाय खड्ड्यात गेल्याने ते जमीनीवर जोरात पडल्याने त्यांच्या डाव्या हाताला व पायाला जखम झाली.
दिवसभराचा चाललेला हा राडा अखेर पोलिसांच्या सौम्य लाठीमाऱ्याने संपला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी कमानी विना दहीहंडी उत्सव साजरा करण्याच्या तयारीला लागले. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चौका चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आत्तापर्यंत पोलीसांनी कोणावरही गुन्हा दाखल केला नसला तरी राडा घालणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर आहे. सध्या वातावरण तणावपूर्ण शांततेत आहे.
कमानीच्या वादावरून कार्यकर्त्यांमध्ये वादावादी
पोलीस निरीक्षक जखमी
==================