BJP alliance Raj Thackeray – महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा लवकरच राज्यातील महायुतीत सहभागी होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समिकरणे पुन्हा एकदा बदलणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने ते सहभागी होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
मनसे महायुतीत आल्यानंतर मनसेचीच ताकद वाढेल, असे महायुतीच्या घटक पक्षांमधील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु, आता दुसरीकडे मनसेच्या महायुतीतील सहभागाला उत्तर भारतीयांचा विरोध आहे. ( BJP alliance Raj Thackeray )
यासंदर्भात उत्तर भारतीय विकास सेनेचे नेते पंडित सुनील शुक्ला यांच्या नेतृत्त्वात आज मनसे-भाजप युतीला विरोध दर्शविण्यात आला. यावेळी या सेनेकडून मनसेचा महायुतीच्या सहभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
तसेच, महाराष्ट्रातील सर्वच पक्ष प्रांतवादी आहेत. पण भाजपने राज ठाकरेंना सोबत घेऊ नये, अशी मागणीही या सेनेकडून करण्यात आली आहे. ( BJP alliance Raj Thackeray )
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना झाल्यानंतर या पक्षाकडून सर्वात प्रथम उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन सुरू केले होते. उत्तर भारतीयांनी महाराष्ट्रात राहू नये, अशी भूमिकाच त्यांच्याकडून घेण्यात आली होती. त्यावेळी अनेक उत्तर भारतीयांना मारहाण करण्यात आल्याने तो वाद चिघळला होता.