पुणे : पत्नीबरोबर झालेल्या भांडणातून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याप्रकरणी न्यायालयाने पतीला जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जी पी अग्रवाल यांनी सुनावली.
या घटनेत अनिता विकास कुमार (वय 25) असे मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. तर विकासकुमार सुरजभान कुमार (वय 30, रा. कात्रज) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी काम पाहिले. त्यांनी आठ साक्षीदार तपासले.
ही घटना 1 मे 2014 रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली होती. आरोपीला दारु पिण्याचे व्यसन होते. तो दारु पिऊन पत्नीला मारहाण करायचा. व पत्नीवर संशय घेत होता. घटनेच्या दिवशी आरोपीचे व पत्नीचे भांडण झाले होते.
पोलिसांनी पतीचा पत्नीच्या मृत्युपूर्वी जबाब घेतला असता त्याने आपण पत्नीला जाळले असल्याचे सांगितले. या जबाबावरुन भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
घटनास्थळी केलेला पंचनामा, प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आलेले नमुने, यांचा अहवाल विचारात घेण्यात आला. मयत पत्नीचा मृत्युपूर्व जबाब, रासायनिक अहवाल, परिस्थितीजन्य पुरावा, तसेच आरोपीने मयतास पेटल्यानंतर न विझवणे, यावर सरकारी वकील मोरे यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार न्यायालयाने पतीला जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.