मुंबई – बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने नुकतेच मेघना गुलजारच्या ‘सॅम बहादूर’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे, ज्याची घोषणा अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर केली. आता विकी हॉकी लेजेंड ध्यानचंद यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता म्हणून दिसणार आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. विकीने याआधी मसान,उरी असे दर्जेदार हिट चित्रपट दिले आहेत.
निर्माता रॉनी स्क्रूवाला यांनी मेजर ध्यानचंद यांच्या बायोपिकबाबतची घोषणा केली. तेव्हापासून हा चित्रपट चर्चेचा विषय आहे. हॉकीपटू ध्यानचंद यांनी देशासाठी दिलेलं योगदान खूप मोठं आहे याची सर्वांना माहिती असली तरी ध्यानचंद यांचा नेमका प्रवास कसा होता याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मोठ्या पडद्यावर ध्यानचंद यांचा जीवनप्रवास उलगडणार असल्यामुळे त्यांच्या भूमिकेत कोण दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
ध्यानचंद यांच्या या बायोपिकमध्ये सुरुवातीला ईशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र आता एका एंटरटेनमेंट मीडियाने दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटातील मुख्य भूमिकेत अभिनेता विकी कौशल झळकणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार निर्माते विकिशी याबाबत चर्चा देखील करत आहे.अंतिम टप्प्यातील चर्चा यशस्वीरीत्या पूर्ण झाली तर विकी या भूमिकेत दिसू शकतो.
विकी कौशलने यापूर्वी उरी या चित्रपटात रॉनी स्क्रूवालासोबत काम केले होते. त्यामुळे आता ही जोडी पुन्हा एकत्र येणार असल्यामुळे प्रेक्षकांना देखील नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे. यासोबतच विकीचा सॅम बहादूर देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.