मुंबई – मेघना गुलजार यांचे दिग्दर्शन आणि विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला सॅम बहादूर हा चित्रपट १ डिसेंबर रोजी भारतात प्रदर्शित झाला होता. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ॲनिमल या संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित चित्रपटाची गेल्या काही दिवसांत प्रचंड हवा आणि वाद निर्माण झाल्यामुळे सॅम बहादूरकडे माध्यमांनी तसे फारसे लक्ष दिले नाही. मात्र या चित्रपटाने सौम्य गतीने वाटचाल करत अखेर यश संपादन केले असून शंभर कोटी रूपयांची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या क्लबमध्ये तो दाखल झाला आहे.
चित्रपटाचा नायक असलेल्या विकी कौशल याने स्वत: एक पोस्ट शेअर करत या यशाची बातमी दिली आहे. फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जिवनावर आधारित या चित्रपटाची कथा असून विकीने माणेकशा यांची भूमिका साकारली आहे.
१०० कोटी रूपयांची कमाई करण्यासाठी या चित्रपटाला १७ दिवसांचा कालावधी लागला. सॅम बहादूरने बॉक्स ऑफिसवर विजय नोंदवला आहे, आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत असे विकीने म्हटले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, खान मंडळींचा बोलबाला असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीत शंभर कोटींची कमाई करणारा सॅम बहादूर हा विकीचा चौथा चित्रपट ठरला आहे. त्याच्या यापूर्वीच्या राजी (१९५ कोटी), उरी- द सर्जिकल स्ट्राइक (३४१.७५ कोटी), जरा हटके जरा बचके (११५ कोटी) या चित्रपटांनी देखील दमदार कमाई केली आहे.