सातारा ( प्रतिनिधी ) – अनेक कारणांमुळे चर्चेत असलेला साताऱ्याचा बहुचर्चित बायोमायनिंग प्रकल्प त्याच्या अवाढव्य बिलामुळे पुन्हा चर्चेत आला आहे . बायोमायनिंग प्रकल्पातून किती खत तयार झाले या सातारकरांना कळायच्या आधीच आरोग्य विभाग व्हाया खजिना असे १ कोटी ९० लाख रूपयांचे बिल नगराध्यक्षांच्या टेबलावर पोहचल्याची खात्रीशीर माहिती आहे . या बिलाच्या कार्यतत्परतेत काही अधिकारी व पदाधिकारी सहभागी असल्याने या बिलाची लगीनघाई चांगलीच चर्चेत आहे .
सातारा शहराच्या सोनगाव कचरा डेपो प्रकल्प क्षेत्रात उभा राहिलेला बायोमायनिंग प्रकल्प सातत्याने चर्चेत राहिला आहे . 2 कोटी 90 लाख रुपयांचा हा प्रकल्प अनेक तांत्रिक आणि राजकीय कारणांमुळे 6 कोटी 40 लाख रुपयांवर पोहचला . आता या प्रकल्पात किती लिचड ( खत ) तयार झाले ही माहिती गुलदस्त्यात असताना तब्बल 1 कोटी 90 लाख रूपयांचे बिल अत्यंत जलद गतीने आरोग्य लेखा , मुख्याधिकारी कक्ष येथून थेट नगराध्यक्षांच्या टेबलावर पोहचले आहे .
हे बिल पास करून घेण्यासाठी काही जणांची उडालेली लगीनघाई नक्की पाणी कुठतरी मुरतेय ? अशा स्वरूपाची आहे . आरोग्य विभागाची कोणतीही टिप्पणी नसताना थेट बिलाची फाईल सहीसाठी नगराध्यक्षांच्या टेबलावर आल्याने उलटसुलट चर्चांना सुरवात झाली आहे .
या संपूर्ण प्रकरणावर लेखापरीक्षकांनी मात्र चुप्पी साधली असून या बिलाची लगीनघाई नक्की कोणासाठी याचा प्रश्न सातारकरांना पडला आहे . खताचा क्वालिटी कंट्रोल रिपोर्ट देणारी शासकीय प्रयोगशाळा कराडात असताना ठेकेदार एजन्सीने हा अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेतून मागविण्याची किमया साधली आहे .
नगरसेवक वसंत लेवे यांनी या प्रकल्पांच्या अनियमिततेची तक्रार जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्याकडे केली आहे . या प्रकरणी अगदी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा लेवे यांनी दिला आहे . तरीसुध्दा त्याकडे दुर्लक्ष करून पालिकेत चाललेली बायोमायनिंगच्या बिलाची लगीन घाईत वऱ्हाडी मात्र चेक कधी निघणार याकडे डोळे लावून बसले आहे.
नगराध्यक्ष माधवी कदम या कोणत्याही फाईलीवर अभ्यास केल्याशिवाय सही करत नाही असे सांगितले जाते . बायोमायनिंगच्या या बिलाचा त्यांनी विशेष अभ्यास करावा अशी गळ सतर्क सातारकरांनी नगराध्यक्षांना घातली आहे .