- शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर
- मीनल यादव यांच्या राजीनाम्याचीही मागणी
पिंपरी – भाजपपाठोपाठ शिवसेनेतील अंतर्गत वादही आता चव्हाट्यावर आला आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी अखेर नगरसेवक राहुल कलाटे यांना शिवसेना गटनेते पदाचा राजीनामा देण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले होते. त्यानुसार कलाटे यांनी मंगळवारी (दि. 16) विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. कलाटे यांनी पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी गटनेते पदाच्या राजीनाम्यासह मीनल यादव यांचा स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा देखील घेण्यात यावा, अशी आग्रही मागणी शिवसेनेतील नाराज नगरसेवकांनी पक्षनेतृत्वाकडे केली आहे. तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांवर उघड-उघड आरोप-प्रत्यारोप सुरु झाल्याने आता शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
18 फेब्रुवारीला स्थायी समितीवर नवीन 8 सदस्यांची निवड करण्यात आली. शिवसेनेच्या कोट्यातून नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांचे नाव देण्यात आले होते. परंतु गटनेते राहुल कलाटे यांनी मीनल यादव यांचे नाव स्थायी समितीसाठी दिल्याचा आरोप करत पक्षातील एका गटाने आक्रमक भूमिका घेतली. कलाटे यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी कलाटे यांना 24 फेब्रुवारीला राजीनामा देण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार कलाटे यांनी पक्षश्रेष्ठींकडे 25 फेब्रुवारीला राजीनामा पाठविला. शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी कलाटे यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी खुलासा सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी याबाबतचा खुलासा दिला होता. दरम्यान, कलाटे यांना विभागीय आयुक्तांकडे राजीनामा देण्याचे आदेश रविवारी (दि. 14) रात्री ई-मेलद्वारे देण्यात आले. त्यानुसार त्यांनी मंगळवारी (दि. 16) विभागीय आयुक्तांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
शिवसेनेचे महापालिकेत 9 नगरसेवक आहेत. नगरसेवक राहुल कलाटे हे प्रभाग क्रमांक 25 मधून निवडून पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर त्यांची शिवसेना गटनेते पदावर वर्णी लागली. त्यांनी 2 वर्ष स्थायी समितीचे सदस्य पद देखील भूषविले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग दोनदा निवडणूक लढविली होती. परंतु दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला.