पाटणा – बिहारमध्ये कलंकित नेत्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याचा मुद्दा तापला आहे. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधत त्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
नितीश यांच्या पक्षाचे (जेडीयू) नेते मेवालाल चौधरी यांची बिहारच्या नव्या मंत्रिमंडळातील वर्णी वादग्रस्त ठरली आहे. चौधरी यांनी काही वर्षांपूर्वी बिहार कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची जबाबदारी सांभाळली.
त्यांच्या कार्यकाळातील नियुक्त्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे. त्यावरून चौधरी यांच्या विरोधात 2017 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर जेडीयूमधून त्यांना निलंबित करण्यात आले. तसे असूनही दुसऱ्यांदा आमदार बनलेल्या चौधरी यांना मंत्री करण्यात आले. एवढेच नव्हे तर, त्यांच्याकडे महत्वाच्या शिक्षण खात्याची धुरा सोपवण्यात आली.
आता चौधरी यांच्यासारख्या कलंकित नेत्याला शिक्षण मंत्री केल्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. विरोधकांच्या महाआघाडीचे नेते तेजस्वी यादव यांनी एका ट्विटद्वारे तो मुद्दा उपस्थित केला. चौधरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत.
त्यांना भ्रष्टाचाराचे बक्षीस म्हणून नितीश यांनी मंत्रिपद दिले का? चौधरी यांना लूट करण्याची मोकळीक देण्यात आली आहे का, असे सवाल त्यांनी केले. कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांकडून चौधरी यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी करण्यात आली.
चौधरी यांची शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती हा बिहारमधील जनतेचा अवमान आहे. त्या नियुक्तीमुळे नितीश यांनी स्वत:चीच प्रतिमा कलंकित केली आहे, अशी प्रतिक्रिया त्या पक्षांकडून देण्यात आली. चौधरी यांच्या विरोधात निदर्शनांचे सत्र आरंभण्याचा इशाराही विरोधकांकडून देण्यात आला आहे.