‘त्या’ कारवाईला बायडेन यांचा होता विरोध – ओबामांचा आणखी एक गौप्यस्फोट

वॉशिंग्टन- अमेरिकेने 2 मे 2011 रोजी पाकिस्तानातील एबोटाबाद येथे आत घुसून एक धडक कारवाई केली होती. त्यात जगभरातील दहशतवादाचा सगळ्यांत क्रूर आणि भेसूर चेहरा असलेला अल कायदाचा म्होरक्‍या ओसामा बीन लादेन मारला गेला होता.

या कारवाईची गोपनीयता राखणे हेच सगळ्यांत मोठे आव्हान होते. मात्र त्यात अमेरिकेला यश आले. तथापी, या कारवाईला तत्कालीन उपाध्यक्ष अर्थात अमेरिकेचे आताचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा विरोध होता.

खुद्द अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीच हा दावा केला आहे. ओबामा यांनी प्रॉमिस्ड लॅंड नावाचे पुस्तक लिहिले असून त्यात हा खुलासा केला आहे.

ओबामा या पुस्तकात म्हणतात की ओसामा बीन लादेनने पाकिस्तानात आश्रय घेतल्याची माहिती होती. त्यावर काय आणि कशी कारवाई करता येउ शकते, याचा विचार सुरू होता. या केल्या जाणाऱ्या कृतीत गोपनीयता राखणे अत्यंत महत्वाचे होते.

पाकिस्तानला या कामी विश्‍वासात घेण्याचा प्रश्‍नच नव्हता. कारण त्यांचे लष्कर व विशेषत: त्यांची कुख्यात गुप्तचर संस्था व त्यातील काही घटक तालिबानशी व संभवत: अल कायदाशीही जोडले गेले असण्याची शक्‍यता होती. त्यामुळे त्यांना याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती.

गोपनीय कारवाईची जी रणनीती आखण्यात आली होती, त्याला तत्कालीन संरक्षण मंत्री रॉबर्ट गेटस आणि उपाध्यक्ष ज्यो बायडेन यांनी विरोध केला होता. मात्र तरीही ही मोहीम फत्ते करण्यात आली.

पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था त्यांचे दहशतवादी नेटवर्कशी असलेल्या संबंधांचा भारत आणि अमेरिका यांच्या विरोधात व्युहात्मक दृष्ट्या वापर करतात. त्यामुळे त्यांना या कारवाईची कुणकुण लागणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती.

लादेनबाबतची थोडी जरी माहिती कोणाला कळली तरी आमच्या हातून ही संधी निसटून जाईल याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळे अगदीच मोजक्‍या लोकांना या मोहीमेची माहिती होती. आम्ही कोणताही पर्याय निवडला असता तरी त्यात एकच अडचण होती ती म्हणजे पाकिस्तान. त्यामुळेच त्यांना कोणत्याही पर्यायात सहभागी करून घेता येउ शकत नव्हते, असेही ओबामा यांनी नमूद केले आहे.

ओबामा पुढे म्हणतात की लादेनवर ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली त्या एबोटाबादमध्ये काही अंतरावरच पाकिस्तानी लष्कराची उपस्थिती होती. अशात जर लादेनच्या संदर्भात काही माहिती पाकिस्तानला सांगण्यात आली असती तर ती लीक होण्याचीच शक्‍यता अधिक होती.

लादेनवर कारवाईसाठी दोनच पर्याय होते. एकतर हवाई हल्ला करणे अथवा हेलीकॉप्टरच्या सहाय्याने एका पथकाने गुपचूप पाकिस्तानात दाखल होत तेथील पोलिसांना काही कळण्याच्या आत छापा मारून पसार होणे. आमच्या टीमने दुसरा पर्याय निवडला.

ओबामा म्हणाले की कारवाईनंतर (लादेनचा खातमा केल्यानंतर) त्यांनी जगातील अनेक नेत्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र सगळ्यात कठीण काम होते, ते पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती आसिफ अलि झरदारी यांच्याशी बोलण्याचे. कारण त्यांच्या राष्ट्राच्या सार्वभौमतेचे उल्लंघन करत कारवाई झाली होती व त्यामुळे त्यांना नाचक्कीचा सामनाही करावा लागला होता. मात्र झरदारी यांना फोन केल्यावर त्यांनी आमचे अभिनंदन केले व सहकार्य करण्याची ग्वाहीही दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.