कार्ला – दिवाळी पाडव्यापासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कार्ला वेहरगाव येथील आई एकवीरा देवीचे मंदिर सोमवारी भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. सोमवारी पहाटे विधिवत कार्ला एकवीरा देवीचा पुजारी व गुरव सदस्यांच्या उपस्थितीत अभिषेक व आरती करण्यात आली.
आरतीच्या वेळी वेहरगाव दहिवली सरंपच चंद्रकांत देवकर, पोलीस पाटील अनिल पडवळ, सुरेश गायकवाड, मधुकर पडवळ, राजू देवकर, संतोष गायकवाड, अनिल गायकवाड, गणेश बोरकर, संतोष बोत्रे यांच्यासह भाविक उपस्थित होते. मंदिराचा परिसर निर्जंतुकीकरण करून घेण्यात आला होता. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनरांगेत ठराविक अंतरावर उभे राहण्यासाठी चौकोनी बॉक्स तयार करण्यात आले आहेत. तसेच दर एक तासांनी मंदिर काही वेळ बंद ठेवणार असून, निर्जंतुकीकरण करून घेण्यात येणार असल्याचे देवस्थान समितीचे व्यवस्थापक मंगेश गायकवाड व बाळू गायकवाड यांनी सांगितले.
श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट सध्या प्रशासनाच्या ताब्यात असून, येथील दैनंदिन कारभार हा वडगाव मावळचे न्यायाधीश, तहसीलदार व धर्मादाय आयुक्त या त्रीसदस्यीय समितीच्या माध्यमातून पाहिला जातो. भाविकांनी मंदिरात येताना सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे आहे. तसेच हातपाय स्वच्छ धुवावेत, असे आवाहन देवस्थान प्रशासकीय समितीकडून करण्यात आले.