पुणे : शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी रात्री नवी मुंबई परिसरात कारवाई केली. मुळशीतील गुंड विठ्ठल शेलारसह रामदास मारणे यांच्यासह साथीदारांना नवी मुंबईत पकडले. गुन्हे शाखेच्या पथकाने मोहोळ खून प्रकरणात मुळशीतून चार जणांना ताब्यात घेतले.
मोहोळ खून प्रकरणात मारणेसह आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. ५ जानेवारी रोजी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात मोहोळवर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आला होता. मोहोळचा साथीदार असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी खून केला होता.
खून प्रकरणात दोन वकिलांना अटक करण्यात आली आहे. खून प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस मुख्य सूत्रधाराचा शाेध घेत होता. मुळशीतील गुंड विठ्ठल शेलार, रामदास मारणे नवी मुंबई परिसरातील एका फार्म हाऊसवर असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांच्या पथकाने शेलार, मारणे यांच्यासह सहा जणांना नवी मुंबईतून ताब्यात घेतले. मुळशी तालुक्यातून चार जणांना ताब्यात घेण्यात आले.