नवी दिल्ली – राम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारी 2024 रोजी पार पडणार आहे.अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात आता भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरली मनोहर जोशी हे सहभागी होणार असल्याचे समोर येत आहे.
या दोन्ही दिग्गज नेत्यांना 22 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी यापूर्वीच निमंत्रण पत्रे पाठवण्यात आली होती. मात्र विश्व हिंदू परिषदेच्या प्रमुख नेत्यांनी त्यांची पुन्हा एकदा भेट घेत कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यास संमती वर्तविली आहे.
राममंदिर आंदोलनात सर्वात मोठी भूमिका बजावणारे लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरली मनोहर जोशी हे दोन प्रमुख नेते अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचा गैरसमज काही नेत्यांच्या विधानांमुळे निर्माण झाला होता.
या दोन्ही नेत्यांची प्रकृती चांगली नसल्याने ते उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने या दोन्ही दिग्गज नेत्यांना निमंत्रणपत्रे दिली आणि कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण देण्यात आल्याचे स्पष्ट करत फोटो प्रसिद्ध केला.