पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गुढी पाडव्याच्या दिवशी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीला पुणेकरांनी विणलेले वस्त्र परिधान करून सजवण्यात आले होते. यानिमित्ताने पुणेकरांच्या आस्थेचा योग्य सन्मान झाला असल्याच्या भावना हेरिटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका अनघा घैसास यांनी व्यक्त केल्या.
ट्रस्टतर्फे दि. १० ते २२ डिसेंबर या कालावधीत पुण्यात “दो धागे श्रीराम के लिए’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत पुणेकरांनी फर्गसन रस्त्यावरील सौदामिनी हँडलूम या ठिकाणी येऊन हातमागावर आपल्या लाडक्या रामलल्लासाठी श्रद्धेचे आणि विश्वासाचे दोन धागे विणले होते. या दरम्यान तब्बल १२ लाख ३६ हजार नागरिकांनी या उपक्रमांत सक्रीय सहभाग घेतला.
गुढीपाडव्यानिमित्त पुणेकरांनी विणलेल्या या धाग्यांपासून तयार करण्या आलेले वस्त्र रामलल्लाला प्रात: समयी गुढी उभारताना घालण्यात आले. यावेळी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे महासचिव चंपत राय यांची उपस्थिती होती. त्यांनी स्वत: रामलल्लाचा वस्त्र परिधान केलेला फोटो पाठवत ही माहिती दिली, अशी माहिती घैसास यांनी दिली.