मुंबई – एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मूळ शिवसेनेत सुरु झालेली पडझड थांबताना दिसत नाही. विविध ठिकाणचे पदाधिकारी आणि नेते शिंदे गटाला पाठींबा देताना दिसत आहेत. ठाण्यापाठोपाठ आता पालघरमधील अनेक कार्यकर्त्यांसह नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
पालघर जिल्ह्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडलय. शुक्रवारी रात्री उशिरा पालघरमधील पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांची भेट घेतली. वसई – विरार मनपातील ५, विक्रमगड नगर पंचायतीमधील जिजाऊ संघटनेचे १९ नगरसेवक, तलासरी नगर पंचायतीतील जिजाऊ संघटनेचे ५ नगरसेवक, मोखाडा नगर पंचायतीच्या १२ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे फडणवीस सरकारला आपला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला.
पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, आमदार श्रीनिवास वनगा, माजी पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा तसेच जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे उपस्थित होते.या सगळ्यांच्या साथीने शिवसेनेची ठाणे ग्रामीण भागातील आमची ताकद वाढली असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केले.
वसई – विरार मनपातील ५, विक्रमगड नगर पंचायतीमधील जिजाऊ संघटनेचे १९ नगरसेवक, तलासरी नगर पंचायतीतील जिजाऊ संघटनेचे ५ नगरसेवक, मोखाडा नगर पंचायतीच्या १२ नगरसेवकांनी युती सरकारला आपला जाहीर पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. #realshivsena #palghar pic.twitter.com/oghYW9B6eT
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 15, 2022
दिवसेंदिवस शिंदे गटाला वाढत पाठींबा लक्षात घेता शिवसेनेसाठी ही मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे. एकीकडे सत्ता गेली आणि दुसरीकडे पक्ष फुटत चालल्याने आगामी निवडणुकांसाठी शिवसेना मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.