मोठी बातमी! यवतमाळपाठोपाठ अमरावतीत लॉकडाऊन

मुंबई – राज्यात काही दिवसांपासून पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर यवतमाळपाठोपाठ अमरावतीतही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने अमरावती जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारपासून जिल्हा बंद ठेवण्यात येणार असून, केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरू राहतील, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

अमरावतीत चार दिवसांपासून करोनाचे रुग्ण वाढत असून, 14 फेब्रुवारीला 435 रुग्ण सापडले असून, दोन जणांचा मृत्यू झाला, तर 15 फेब्रुवारीला 439 रुग्ण सापडले आणि 4 जणांचा मृत्यू झाला. तसेच 16 आणि 17 फेब्रुवारीला अनुक्रमे 495 व 498 रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सकाळी मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत यवतमाळसह आणखी दोन जिल्ह्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल, असा इशारा दिला होता. अकोला, अमरावती, यवतमाळमध्ये लॉकडाऊन करण्याचे स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात आलेले असून, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना हे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

विदर्भात अकोल्यात 74, अमरावतीत 82, अमरावती मनपा क्षेत्रात 310, यवतमाळमध्ये 71 करोना रुग्ण आढळले आहेत. अकोला परिमंडळातच एकूण 662 रुग्ण आढळले आहेत. या तिन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासन ऍलर्ट झाले आहे. गेल्या तीन ते चार महिन्यानंतर पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले आहे. 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये करोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली असून त्यामुळे विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.