पुणे – कात्रज घाटातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या कचऱ्यात अवघ्या एका दिवसाच्या बाळाला टाकून देण्यात आले होते. या बाळाची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक मधुरा कोराणे या दुचाकीवरून बाळाला रूग्णालयात घेऊन गेल्या.
त्या बाळाला घेऊन जात असतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यामुळे महिला सोशल मिडयात मधुरा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज घाटातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या कचऱ्यात बाळाला कोणीतरी टाकून दिले असल्याची माहिती सकाळी नागरिकांनी आम्हाला दिली. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक मधुरा कोराणे यांनी धाव घेतली.
मधुरा कोराणे यांनी बाळाला घेऊन ससून रुग्णालय गाठले. तेथे बाळाची तपासणी करुन त्याला निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. बाळाची प्रकृती ठणठणीत असून उपचार सुरू आहेत. आसपासच्या भागातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून बाळाला टाकून जाणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.