चेन्नई – अमिरातीत गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत सातत्याने अपयशी ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलच्या नावाची जादू आजही कायम असल्याचेच दिसून आले. यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात मॅक्सवेलने सर्वाधिक किंमत मिळवली. त्याला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बेंगळूरूने तब्बल 14.25 कोटी रुपये बोली लावून विकत घेतले.
तर दुसरीकडं ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टिव्ह स्मिथचा मात्र, या लिलावात भ्रमनिरास झाला. त्याला दिल्ली कॅपिटल्सने दोन कोटी रुपयांची मूळ किंमत असताना केवळ वाढीव 20 लाख रुपये देत 2 कोटी 20 लाख रुपयात विकत घेतले.
गेल्या वर्षी अपयशी ठरलेल्या स्मिथला राजस्थान रॉयल्सने करारमुक्त केले होते. गेल्या लिलावात स्मिथला राजस्थानने तब्बल 12 कोटी रुपयांत खरेदी केले होते. भारताचा नवोदित खेळाडू अष्टपैलू शिवम दुबेसाठी 50 लाखांची मूळ किंमत असताना राजस्थानने त्याला 4 कोटी 40 लाख रुपयांत आपल्याकडे घेतले.
तसेच वर्षभराच्या क्रिकेटबंदीची शिक्षा भोगून आलेल्या बांगलादेशच्या अनुभवी शाकिब अल हसनला कोलकाता नाईट राडर्सने 3 कोटी 20 लाखांत आपल्या संघात घेतले.