मुंबई – शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांचे ठाण्यातील जमीन आणि दोन फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लॉंड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत ईडीने प्रताप सरनाईकांची 11.35 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांचे संचालक, प्रमुख अधिकारी, 25 डिफॉल्टर आणि इतरांवर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लॉंड्रिंगचा तपास सुरू केला आहे. आरोपींनी गुंतवणुकदारांची फसवणूक करण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे.
गुंतवणूकदारांना नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडच्या प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास प्रवृत्त केलं, बनावट कागदपत्रं तयार केली, खोटी खाती तायर केली आणि त्याद्वारे फसवणूक केल्याचा आरोप आहे. 13 हजार गुंतवणूकदरांची 5600 कोटींची फसवणूक केल्याची माहिती ईडीने दिली आहे.
तपासात आढळून आलें आहे की, वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे कर्जदार/ट्रेडिंग सदस्यांनी रिअल इस्टेटमधील गुंतवणूक, थकित कर्जाची परतफेड आणि इतर गोष्टींसाठी वळवले होते.
ईडीने केलेल्या तपासानुसार, आस्था ग्रुपकडे एनएसईएलची 242.66 कोटींची थकबाकी होती. आस्था ग्रुपने सन 2012-13 कालावधीत विहंग आस्था हाऊसिंग प्रोजेक्टकडे 21.74 कोटी वळते केले. त्यापैकी 11.35 कोटी विहंग एंटरप्राइजेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडकडे वळते करण्यात आले.
या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असल्याची माहिती ईडीने दिली.
ईडीने पैशांच्या या साखळीचा तपास केल्यानंतर प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली असून त्यांच्या नावे असणारे दोन फ्लॅट आणि जमिनीचा भाग जप्त केला आहे. याची एकूण किंमत 11.35 कोटी आहे.
ईडीने आतापर्यंत या घोटाळा प्रकरणी 3254.2 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ईडीकडून अद्यापही तपास सुरु आहे.