मुंबई : शिवसेना(बाळासाहेब ठाकरेंची) आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. त्यांना औरंगाबादहून एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.त्यांच्यावर औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांना उपचारासाठी मुंबईकडे रवाना करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दोन दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडलेली होती. सोमवारी दुपारी त्रास जाणवू लागल्याने त्यांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळीच त्यांना तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी संजय शिरसाट आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने संजय शिरसाट यांनी जाहीरपणे नाराजी देखील व्यक्त केली होती.