नवी दिल्ली – पंजाबमधील कॉंग्रेसचे दोन आमदार आज भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यापैकी एक आमदार हे आगामी विधानसभेच्या निवडणूकीसाठी संभाव्य उमेदवार असणार असे मानले जात होते. मात्र या आमदारांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
फतेह जंग सिंग बाजवा यांचा यामध्ये समावेश आहे. बाजवा हे खासदार प्रताप बाजवा यांचे बंधू आहेत. फतेह जंग सिंग हे काडियान मतदार संघातील आमदार आहेत. आता या जागेवरून खासदार प्रताप बाजवा हे विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे या मतदार संघात दोन भावांमधील टक्कर बघायला मिळण्याची शक्यता आहे.
त्यांच्याव्यतिरिक्त हरगोबिंदपूर येथील कॉंग्रेसचे आमदार राणा बलविंदर सिंग लड्डी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी गुरमीत सिंग सोधी यांनी देखील कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोधी हे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे समर्थक मानले जातात. मात्र कॉंग्रेस सोडल्यावर अमरिंदर यांच्या पक्षात जाण्याऐवजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.