नवी दिल्ली – दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या जी 20 परिषदेच्या काळात दिल्ली,नॉयडा आणि गुरुग्रामच्या आसपासच्या भागातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमची सुविधा जाहीर केली आहे. परिषदेचा मुख्य कार्यक्रम 9-10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.
या शिखर परिषदेला 29 राष्ट्रांचे प्रमुख तसेच युरोपियन युनियनचे उच्च अधिकारी आणि 14 आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या अवधीत 8 ते 10 सप्टेंबर रोजी दिल्लीतील सर्व खाजगी आणि सरकारी कार्यालये बंद राहतील, तर नवी दिल्ली परिसरातील बाजारपेठांसह बॅंका आणि व्यावसायिक आस्थापना या तीन दिवसांत बंद राहतील.
सुरक्षा उपायांमुळे विविध ठिकाणचे रस्ते या कालावधीत बंद ठेवले जाणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला आहे. जगभरातील प्रमुख देशांचे लक्ष दिल्लीतील हा कार्यक्रमाकडे असणार आहे.
पर्यटनस्थळांना भेट देता येणार का?
राजघाट, प्रगती मैदान आणि नवी दिल्ली पोलीस जिल्हा आणि NDMC क्षेत्र वगळता सर्वत्र पर्यटन स्थळे लोकांसाठी खुली राहतील. लोक तिथे कुटुंबासह जाऊ शकतात. कुतुबमिनार, लाल किल्ला, अक्षरधाम मंदिरासह सर्व ठिकाणे लोकांसाठी खुली असतील. याशिवाय सदर बाजार, चांदणी चौक, सरोजिनी नगर आदी प्रमुख बाजारपेठाही लोकांसाठी खुल्या राहतील. लोकांनी त्यांच्या प्रवासासाठी मेट्रो सेवेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.