Big Bash league, Melbourne Renegades vs Perth Scorchers : ऑस्ट्रेलियाच्या T20 फ्रेंचाइज लीगमध्ये एक लाजिरवाणी घटना घडली आहे. येथे खेळल्या जात असलेल्या बिग बॅश लीगमध्ये खराब खेळपट्टीमुळे सामना रद्द करावा लागला. खेळपट्टीच्या जीवघेण्या प्रकारामुळे सामन्याच्या पहिल्या 6 षटकांमध्ये सामना थांबवावा लागला. बराच विचारविनिमय केल्यानंतर हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बिग बॅश लीगचा नवा हंगाम 7 डिसेंबरपासून सुरू झाला आहे. आज (10 डिसेंबर) मेलबर्न रेनेगेड्स आणि पर्थ स्कॉचर्स यांच्यात सामना खेळला जात होता. या मोसमातील हा केवळ चौथा सामना होता. मेलबर्न रेनेगेड्सचा कर्णधार निक मॅडिन्सनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
खेळपट्टीची अवस्था इतकी वाईट होती की फलंदाजांना धावा काढणे कठीण झाले होते. पर्थ स्कॉचर्सचे सलामीवीर स्टीफन (0) आणि कूपर (6) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. अॅरॉन हार्डी आणि जोश इंग्लिस हे कसेतरी गोलंदाजांचा सामना करत होते पण 6.5 षटकांनंतर खेळपट्टीच्या मारकपणामुळे सामना थांबवावा लागला.
पंचांनी दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याशी दीर्घ संभाषण केले आणि सामना संयोजकांशीही दीर्घ संभाषण केले. यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही संघांना समान गुणांचे वाटप करण्यात आले.
Hear from Aaron Finch on the @FoxCricket mic as the umpires have a chat about the pitch in Geelong…#BBL13 pic.twitter.com/PsHbPQZZaL
— KFC Big Bash League (@BBL) December 10, 2023
खेळपट्टीची अशी अवस्था का झाली?
हा सामना जिलॉन्गच्या सिमंड्स स्टेडियमवर खेळला जात होता. काल रात्री येथे पाऊस झाला. खेळपट्टीवर काही डाग दिसत होते ज्यावरून असे दिसते की कव्हरमधून पाणी खेळपट्टीवर पोहोचले आहे. त्यामुळेच खेळपट्टी खराब झाली आणि सामन्यात गोलंदाजीदरम्यान चेंडू अनियमीत (अधिकच) बाऊन्स होत होते. त्यामुळे फलंदाजांना खेळणे मुश्किल आणि धोकादायक झाले. यामुळे फलंदाजांना दुखापत होण्याची शक्यता होती. खेळातील खेळपट्टीचे जीवघेणे स्वरूप पाहून क्रिकेटपटूही आश्चर्यचकित झाले. विकेटकीपिंग करणारा क्विंटन डी कॉकही काही चेंडूंवर अवाक होताना दिसला. या घटनेनंतर बिग बॅश लीगचे आयोजक आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाला नक्कीच या घटनेबाबत खेद वाटला असेल.