नागपूर – महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) (DRI) देशभरात तीन शहरात कारवाई करीत 31.7 किलो सोन्यासह 11 तस्करांना अटक केली. या सोन्याची (gold) किंमत 19 कोटींहून अधिक आहे.
रेल्वेमार्गे हे आरोपी तस्करी करत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मुंबईत 5, वाराणसी 2 आणि नागपुरात 4 जणांना अटक करण्यात आली.
हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसमधून सोन्याची तस्करी करीत असलेल्या दोघांना 8.5 किलो सोन्यासह नागपुरात अटक करण्यात आली. राहुल (36) आणि बाळुराम (41) नावाचे दोघेही नागपूरचे असून ते एस-4 मध्ये आसन क्रमांक 24 आणि 28 वर बसले होते.
त्यांच्याकडील दोन बॅगमध्ये अंदाजे 8.5 किलो विदेशी चिन्हांकित सोन्याची बिस्किटे होती. त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून सोन्याचे दोन रिसिव्हर्सही ओळखून त्यांना पकडण्यात आले. या सिंडिकेटने बांगलादेशच्या सीमेवरून भारतात आणलेल्या सोन्याची तस्करी केली.
तर दुसरीकडे, वाराणसी टीमने कारने प्रवास करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्यांनी रस्ता आणि जंगलात 3 तासांच्या नाट्यमय पाठलागानंतर आरोपींना पकडण्यात यश मिळवले.
दोन व्यक्ती आणि कारमधून सुमारे 18.2 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. कोलकाताहून रेल्वेने सोने घेऊन निघालेल्या 5 आरोपींना मुंबईच्या रस्त्यांवर शोधण्यात टीमला यश आले. त्यांच्याकडून 4.9 किलो सोने जप्त करण्यात आले.