मुंबई : ठाण्यातील बाळकुम येथे एका निर्माणाधीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत आता पर्यंत सात मजुरांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. ठाण्यातील बाळकुम परिसरातील रुणवाल आयरीन या निर्माणधीन इमारतीच्या ४० मजल्यावरून खाली ही लिफ्ट कोसळली आहे. एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
रविवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. हा अपघात नेमका कसा झाला याविषयी अजूनही माहिती समोर आली नाही. महेंद्र चौपाल , रुपेश कुमार दास, हारून शेख ,मिथलेश , कारिदास , अशी पाच मृत कामगारांची नावे आहेत तर, अन्य दोन कामगारांचे नाव समजू शकलेले नाही. सुनिल कुमार दास हा कामगार गंभीर जखमी आहे.
बाळकुम येथील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल आयरीन या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ४० मजल्याची ही इमारत आहे. या इमारतीच्या छतावर रविवारी वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार सायंकाळी ५.३० वाजता लिफ्टने खाली येत होते. त्यावेळी लिफ्टची दोरी तुटून हा दुर्दैवी अपघात झाला.
दीड ते दोन तासानंतर इतर कामगार तेथून जात असताना हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाच्या जवान आणि स्थानिक माजी नगरसेवक संजय भोईर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत सहा कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. अन्य एकाच उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सुनिल हा कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याविषयी अद्याप समजू शकलेले नाही. या अपघाताची पोलीस चौकशी करीत आहेत.