ब्रुसेल्स – मध्यपूर्वेमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्वतंत्र पॅलेस्टाईन देश अस्तित्वात आणणे ही एकमेव विश्वासार्ह उपाययोजना असल्याचे युरोपीय संघाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी स्वतंत्र पॅलेस्टाईनला स्पष्ट शब्दात विरोध केला आहे. त्यांच्या या भूमिकेवरून युरोपीय संघाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
पॅलेस्टाईनला सुरक्षेची हमी ददिली जायला हवी. तसेच स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या अस्तित्वासाठी सामुहिक प्रयत्न केले जायला हवेत, असे युरोपीय संघाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एकमताने म्हटले आहे. फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ब्रुसेल्स येथे पत्रकारांना ही माहिती दिली. हमास-इस्रायल युद्ध समाप्तीनंतरच्या चर्चेसाठी इस्त्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅटझ आणि जॉर्डनचे परराष्ट्र मंत्री अयमान सफादी हे देखील बेल्जियमच्या राजधानीत होते.
युद्ध लवकर समाप्त करण्यात यावे, असा अमेरिकेचा आग्रह देखील इस्रायलने अद्याप मान्य केलेला नाही अरब देशांमधूनही इस्रायलसमोर मांडल्या गेलेल्या मध्यस्थीच्या प्रस्तावाला अद्याप सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला नाही. इस्रायलच्या आक्रमणामध्ये गाझामधील मृतांची संख्या २५ हजारांच्याही पुढे गेली आहे, असे गाजामधील आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
युरोपीय संघामध्ये युरोपातील २७ देशांचा सहभाग आहे. इस्रायल आणि हमास दरम्यानच्या युद्धाबाबत या गटामध्येही मतभेद आहेत. इस्रायलला मदत करण्याला काही देश तयार आहेत. तर काही देशांनी याला जोरदार विरोध केला आहे. मात्र युद्ध लवकरात लवकर समाप्त व्हावे आणि स्वतंत्र पॅलेस्टाईनचे अस्तित्व मान्य करण्यात यावे, यावर या गटातील बहुतेक देशांचे एकमत झाले आहे.