Wipro News: विप्रोचे थियरी डेलापोर्ट सीईओने यांनी राजीनामा दिला आहे. कंपनीने 6 एप्रिल रोजी सीईओ डेलापोर्ट यांचा राजीनामा जाहीर केला आहे. आता त्यांच्या जागी श्रीनिवास पल्लिया हे नवे सीईओ असतील. विप्रो काही दिवसात मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करणार असताना कंपनीने ही घोषणा केली आहे. कंपनीने थियरी डेलापोर्ट यांच्याजागी श्रीनिवास पल्लिया यांची नवीन सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. (Wipro CEO Thierry Delaport resigns, Srinivas Pallia to be new CEO)
कार्यकाळ संपण्यापूर्वी दिला राजीनामा –
थियरी डेलापोर्टे यांनी त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी 14 महिने आधी पद सोडले आहे. त्यांनी 6 जुलै 2020 रोजी विप्रोचे CEO आणि MD म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ जुलै 2025 मध्ये संपणार होता.
श्रीनिवास पल्लिया 1992 मध्ये विप्रोमध्ये सहभागी –
विप्रोचे नवीन सीईओ श्रीनिवास पल्लिया 1992 मध्ये विप्रोमध्ये सामील झाले होते. त्यांनी विप्रोच्या ग्राहक व्यवसाय युनिटचे अध्यक्ष आणि बिझनेस ऍप्लिकेशन सर्व्हिसेसचे जागतिक प्रमुख यासह अनेक नेतृत्व भूमिकांमध्ये काम केले आहे.
विप्रो लिमिटेडचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी एका निवेदनात श्रीनिवास यांचे स्वागत करताना म्हटले आहे की, “आमच्या कंपनीसाठी आणि उद्योगासाठी या महत्त्वाच्या क्षणी विप्रोचे नेतृत्व करण्यासाठी श्रीनिवास हे एक आदर्श लिडर आहेत. गेल्या चार वर्षांत विप्रोने अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत मोठे परिवर्तन केले आहे. श्रीनिवास हे या प्रवासाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचा ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन, विकासाची मानसिकता, मजबूत अंमलबजावणी, विप्रोच्या मूल्यांप्रती त्यांची बांधिलकी कंपनीसाठी फायद्याची ठरेल.”