ग्रामीण भागात शाळांमध्ये ‘सायकल बॅक’ उपक्रम

वाल्हे – येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मिकी विद्यालयामधील विद्यार्थ्यांना पुणे सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांच्या वतीने नऊ सायकलींचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जेजुरी देवस्थानचे विश्‍वस्त राजकुमार लोढा, आडाचीवाडी सरपंच दत्तात्रय पवार, दौंडज उपसरपंच निलेश भुजबळ, तुषार पवार, राजेंद्र डोंगरे, विशांत ठाकूर आदि उपस्थित होते.

आयुक्त देशमुख म्हणाले की, ग्रामीण भागातील बरेचशे विद्यार्थी वाड्यावस्त्या व गावांमधील अंतर मोठे असल्याने शिक्षणाच्या हक्कापासून परावृत्त होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचा टक्का घसरत चालल्याचे समोर येत आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये “सायकल बॅक’ हा उपक्रम आपण राबवत असून यामध्ये आम्ही शाळांना सायकली पुरविणार आहोत. शाळेने त्या सायकली गरजू विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत वापरावयास द्यावयाच्या आहेत. त्यानंतर या सायकली त्यांनी पुन्हा विद्यालयात जमा करायवयाच्या आहेत. जेणेकरून पुढील विद्यार्थ्यांना त्या सायकलचा उपयोग करून घेता येणार आहे. हे करतानाच विद्यालयामध्ये 85 टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये बक्षीस दिले जाणार असून, सायकल बॅंकेव्यतिरिक्त इतरही काही शैक्षणिक मदत लागल्यास ती करण्याचे आश्‍वासनही पुणे सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी दिले. विद्यालयाचे प्राचार्य अंकुश साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. पी. बी. जगताप यांनी सूत्रसंचालन केले तर एस. एम. भामे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.