पिंपरी, (प्रतिनिधी) – जिन्यातील रेलिंगवर खेळताना तोल जाऊन पडल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना १६ फेब्रुवारी रोजी चिंचवडगावातील हुतात्मा चापेकर विद्यामंदिरात घडली. या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. या शाळेत सुरक्षा जाळी बसविण्यास सुरुवात केली आहे.
जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने सार्थक कांबळे (वय १३ रा. काळेवाडी) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेकरिता शाळा प्रशासनाने वेळोवेळी ब प्रभागाची पत्रव्यवहार केला होता. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे १६ फेब्रुवारी रोजी खेळताना सार्थकचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर महापालिका प्रशासनावर टीका झाली. त्यानंतर महापालिकेने या शाळेत जिन्यावर सुरक्षा जाळी बसविण्यास सुरूवात केली आहे. केशवनगर येथील माध्यमिक शाळा धोकादायक झाल्याने येथील जवळपास ३३० विद्यार्थ्यांना चापेकर चौकातील महापालिकेच्या शाळेत स्थलांतर केले आहे. मात्र येथील जुनी इमारत पाडून नवीन इमारत उभारण्यासाठी कोणतीही हालचाल प्रशासनाकडून होताना दिसत नाही. काळेवाडी, थेरगाव येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांना चापेकर चौकातील शाळा लांब पडते. मात्र शिक्षणात खंड पडू नये म्हणून पालक नाईलाजास्तव मुलांना शाळेत पाठवितात.
दोन जिन्यांना कुलूप
चापेकर चौक येथील हुतात्मा चापेकर शाळेच्या इमारतीला तीन जिने आहेत. त्यापैकी एका जिन्यावर हा अपघातात झाला. इतर दोन जिन्यांनाही सुरक्षा जाळी नाही. मात्र उर्वरित दोन्ही जिन्यांना कुलूप लावण्यात येते. शाळेत जर आपाद्कालीन परिस्थिती उद्भवल्यास दुसऱ्या जिन्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढता येऊ शकते. मात्र या दोन्ही जिन्यांना कुलूप लावून चावी शाळेच्या गेटजवळ असलेल्या सुरक्षा रक्षकाकडे असते. त्यामुळे जिन्याचे कुलूप उघडेपर्यंत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
दोन प्रवेशद्वारावर दोन सुरक्षा रक्षक हवेत
शाळेला मुख्य प्रवेशद्वार क्रांतीवीर चापेकर चौकाच्या दिशेने आहे. तर दुसरे प्रवेशद्वार हे भाजी मंडईच्या दिशेला आहे. ही दोन्ही प्रवेशद्वारे शाळेच्या वेळी सुरु ठेवावीत. तसेच येथे तैनात असलेले दोन सुरक्षा रक्षक या दोन्ही प्रवेशद्वारावर ठेवल्यास बाहेरील व्यक्ती शाळेच्या आवारात प्रवेश करू शकणार नाहीत.