पिंपरी – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (शुक्रवारी) शहर दौऱ्यावर येणार आहेत. महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहेत. सकाळी साडेसातपासून पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार असून शहर राष्ट्रवादीच्या वतीनेही जोरदार तयारी करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांची उद्घाटने दीड महिन्यापूर्वी अजित पवार यांच्या हस्ते होणार होती. काही कारणास्तव उपमुख्यमंत्र्यांनी उद्घाटन आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द केला होता. आता हा कार्यक्रम आज शुक्रवार (दि.3) रोजी होणार आहे. महापालिका मुख्यालयातील उद्योग सुविधा कक्ष, सीएसआर सेलचे उद्घाटन, पोलिसांना पेट्रोलिंगकरिता 50 स्मार्ट बाइकचे हस्तांतरण, ग्रीन मार्शल पथकाकरिता हॅण्ड हेल्ड डिव्हाईसचे वाटप, 6 फायर मोटार सायकल्स अग्निशामक विभागाला उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते दिल्या जाणार आहेत. सकाळी साडेसात ते सव्वाआठ या वेळेत हे कार्यक्रम होणार आहेत.
साडेआठ वाजता सीएमई येथील रोईंग प्रशिक्षणाचे उद्घाटन व पाहणी करणार आहेत. सव्वानऊ वाजता भोसरीतील सखुबाई गवळी उद्यानातील बहुमजली वाहनतळाचे भूमिपूजन पवारांच्या हस्ते होणार आहे. पावणेदहा वाजता नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथील हॉकी ऍकडमीचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सव्वादहा वाजता उपमुख्यमंत्री पवार चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देणार असून पाहणी करणार आहेत. पावणेअकरा वाजता तळवडे जॉगिंग ट्रॅक, उद्यानाचे उद्घाटन करणार आहेत. सव्वाअकरा वाजता भक्ती-शक्ती येथील इको ट्रॅकचे भूमिपूजन करणार आहेत.
पावणेबारा वाजता थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर ऍकॅडमी येथील पॅव्हेलिनचे उद्घाटनही पवार करणार आहेत. त्यानंतर एक वाजता वाकड येथील कै. तानाजीभाऊ तुकाराम कलाटे उद्यान, पिंपळ ेसौदागर कुणाल आयकॉन रोड अखिल भारतीय कबड्डी पंच स्वर्गीय बाळासाहेब बाजीराव कुंजीर क्रीडांगणाचे उद्घाटन होणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणेच्या कामाच्या भूमिपूजन होईल.
पक्षाचा कार्यक्रम
शासकीय कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार असून त्यास उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करण्यार आहेत.